Maharashtra Political Crisis: "...तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा", बीडच्या शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:49 AM2022-06-24T10:49:33+5:302022-06-24T10:52:34+5:30
Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड/मुंबई: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडले असून, गरज पडल्यास पदही सोडायला तयार असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोंधळामुळे राज्यातील सरकार कोसळलण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने, त्याला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.
श्रीकांत विष्णू गदळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी 22 जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. पत्राच्या तळाशी आपल्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्ती देण्यासंदर्भात विनंती करणारे हे पत्र तात्काळ राज्यापालांकडे पाठवावे, अशी विनंतीही केली आहे. 'चालू विधानसभेचा कार्यकाळ संपला असून, राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी', असा पत्राचा विषय आहे.
पत्रात काय म्हटलं..?
शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, 'उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही.'
'तरी आज मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली अशताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विवाध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती,' असे गदळे यांनी पत्रात म्हटले आहे.