'ठिकंय, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण...' संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:52 PM2022-06-28T17:52:14+5:302022-06-28T18:00:08+5:30
'भाजपने अडीच-अडीच वर्षांचा शब्द मोडला, त्यामुळेच एकनाथ शिंदेंचे मुख्यंत्रिपद गेले.'
आलिबाग:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसैनिकाचे मेळावे घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आलिबागमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला, यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.
'भाजपमुळे तुमचे मुख्यमंत्रिपद गेले'
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आम्ही हट्ट धरला होता. हे तीन पक्षाचं सरकार आणण्यासाठी सोनिया गांधी, शरद पवार यांनी एक सयंमी नेता हवा असल्याचे म्हटले होते. त्यांनीच उद्धव ठाकरेंना नेतृत्तव करायला सांगितलं होतं. आज जे लोकं भाजपसोबत जाण्यासाठी हट्ट करत आहेत, त्यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले. भाजपने शब्द मोडला, त्यामुळेच एकनाथ शिंदेंचे मुख्यंत्रिपद गेले. त्यांनी शब्द पाळला असता, तर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले असते. उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंचेच नाव होते. पण, ज्यांच्यामुळे तुमचे पद गेले, त्यांच्यासोबत आज युती करण्यास सांगत आहात."
संबंधित बातमी- 'शिंदे गटातले 22 आमदार इतर पक्षातून आले आणि आता...' संजय राऊतांचा घणाघात
'सरकारमधून बाहेर पडू, पण...'
ज्या भाजपमुळे तुमचे मुख्यमंत्रिपद गेले, त्याच भाजपसाठी तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास सांगत आहात. बर ठिकंय, आम्ही मविआमधून बाहेर पडू. पण, तुम्ही मुंबईत या, उद्धव ठाकरेंच्या समोर येऊन तुमचे संख्याबळ दाखवा आणि बाजू मांडा. पण, तुम्ही येणार नाहीत, तुमच्यात हिम्मत नाही. तुम्हाला बंदीस्त करुन ठेवलं आहे. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही श्वासही घेऊ शकत नाही. तुम्ही कुठेही फिरू शकत नाही. तुम्ही त्या हॉटेलमध्ये कैदी म्हणून राहत आहात. तुम्हाला तुमच्या खोलीच्या बाहेर येऊ दिलं जात नाही. तुम्हाला गुलाम बनून ठेवलं आहे तिकडं. अशी गुलामी शिवसेना करू शकत नाही.