Maharashtra Political Crisis:"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:11 PM2022-06-22T17:11:17+5:302022-06-22T17:15:38+5:30
Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.
Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35-40 आमदार घेऊन गेले असून, राज्यातील सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. यातच, संजय राऊतांनी राज्यातील राजकीय प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे, असे ट्वीट केले होते. त्यावर आता शिवसेनेच्या एका बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली आहे.
'स्वाभिमानाने जगू, पण...'
"आम्ही स्वाभिमान गहान ठेवलेला नाही. राखेतून पुन्हा उभे राहू", असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. एका वृत्त वाहिनीशी ते बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले की, "नार्वेकरांना एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किती वेळ लागला, सरकार कोसळणार का याची मला कल्पना नाही. आम्ही कधीच सत्तेची पर्वा केलेली नाही. स्वाभिमानाने जगू, पण शरणार्थी म्हणून नाही,'' अस सावंत म्हणाले.
'राणे-राज ठाकरे गेले तेव्हाही...'
सावंत पुढे म्हणाले की, ''आम्ही कधीच स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. मुठभर मावळे घेऊन जगू, पुन्हा राखेतून उभे राहू. जनता दलापासून हे होत आलं आहे. राज ठाकरे, नारायण राणे जेव्हा गेले तेव्हादेखील राजकीय भूकंप असे शब्द वापरले गेले. मात्र शिवसेना पुन्हा उभा राहिली. मुळात शिवसेना ही आमदारांमुळे नाही, शिवसैनिकांमुळे आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यात पुढील दिशा ठरेल,'' असेही ते म्हणाले.