बंडखोरांची आमदारकी रद्द होणार?; शिवसेनेची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:56 PM2022-06-22T13:56:32+5:302022-06-22T13:57:17+5:30
आता शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत
मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी घडामोड घडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचसोबत गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात नवा पेच निर्माण झाला आहे.
त्यातच आता शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजता ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात येणार आहे. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वांना व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राजकीय परिस्थिती लक्षात घेता याला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे.
तसेच ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई मेल पत्त्यावर पाठवलेली आहे. त्या व्यतिरिक्त समाज माध्यमे, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे कळवले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध, पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणांस गैरहजर राहता येणार नाही. या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं कळालं. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा असा प्रस्ताव शिंदे आणि समर्थक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या आमदारांनी शिवसेनेतच बंड पुकारलं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचा मोठा गट असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना पत्राद्वारे व्हीप पाठवून बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.