संजय राऊत शिवसेनेत पण काम राष्ट्रवादीचं करतात; शिंदे गटाचे आमदार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:10 PM2022-06-30T14:10:52+5:302022-06-30T14:11:34+5:30
पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांना नेहमी आदर होता आणि आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सातत्याने संजय राऊत यांनी सर्वोच्च नेत्यांचा अपमान करणारी विधाने केली. उद्धव ठाकरे सांगतात, वैयक्तिक टीका केली नाही. परंतु बाळासाहेबांचे संबंध, मातोश्रीसोबत असलेलं नाते हे गृहित धरता अशी विधानं यायला नको होती ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे संजय राऊत जितकं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला.
पाठित खंजीर खुपसण्याची भाषा राऊतांनी करू नये
शिवसेना पक्षावर कुणीही दावा केला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. हा वाद तत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांचीच युती झाली आहे. पाठित खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. शिवसेनेत राहायचं आणि निम्म काम राष्ट्रवादीचं करायचं. सकाळी ९ वाजता एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र-राज्यात वाद लावून द्यायचा हेच सुरू आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल केंद्र आणि राज्य शासनात एकोपा लागतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जो काही निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे आमदार आहोत असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला.
सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. प्रत्येक आमदारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनीही जे पद सोडलं शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेना मराठी माणसाची अस्मिता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली होती. अनेक पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम करत होते. प्रत्येकजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली आहे. परंतु निर्णयाला खूप उशीर झाला अशीही माहिती केसरकरांनी दिली.
कुणीही वाईट वाटून घेऊ नये
कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.