खातं दिलं पण स्वत:चा स्वार्थ साधला नाही; शिंदे गटाचं आदित्य ठाकरेंना रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:51 PM2022-06-26T18:51:19+5:302022-06-26T18:52:15+5:30
अजित पवार पडलेल्या उमेदवाराला निधी देत होते. मतदारसंघ बांधण्यासाठी निधी द्यावा लागतो असं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.
गुवाहाटी - खाती दिली, सत्ता दिली त्यातून आम्ही स्वत:चा सार्थ साधला नाही. आमदारांना निधी वाटप नगरविकास खात्यातून दिला गेला. वैयक्तिक अडचणी आल्या तेव्हा कोण उभं राहिलं? पडत्या काळात आम्हाला एकनाथ शिंदे यांनी साथ दिली. इतक्या लोकांनी विश्वास टाकला म्हणून एकनाथ शिंदेसोबत आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही. सोडायची नाही, आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. कुणालाही यापुढे अडचणी येणार नाही त्या अडचणीला आपण सगळे एकत्र असणार आहोत अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे.
भरत गोगावले यांनी व्हिडिओतून म्हटलं की, नाण्याची एक बाजू तुम्ही पाहताय. उरले सुरले जे काही बोलतायेत त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी. अत्यंत तळागाळातून आम्ही काम केले आहे. आमच्या जोडीचे काही आमदार मागच्या वेळी पडले. आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधी तरी पराभव झालेल्या उमेदवारांशी बोलले, मार्गदर्शन केले का? कुणीही विचारत नाही. १ रुपयाचा निधी दिला जात नाही. आमदारकी सोडा, पण नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती यासाठी ताकद देणे गरजेचे होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षापासून सरपंचापर्यंत निधी देत होते. आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून त्यांची सुखदुखं जाणून घ्यायला हवी होती. जेणेकरून भविष्यात आघाडी टिकली नाही टिकली तर उमेदवार उभा करायचा झाला तर कोण तयार आहे याचा आढावा घेता आला असता. मुख्यमंत्री असताना १ रुपया निधी देऊ शकलो नाही. अजित पवार पडलेल्या उमेदवाराला निधी देत होते. मतदारसंघ बांधण्यासाठी निधी द्यावा लागतो. मग निधी नसताना उमेदवार कुठल्या जोरावर उभा राहील. ही ताकद आम्हाला एकनाथ शिंदे यांनी दिली म्हणूनच आज पक्षाच्या आमदारांसोबत अपक्षांनीही त्यांना साथ दिली असंही भरत गोगावले यांनी सांगितले.
शिवसेनेचे ८ मंत्री गुवाहाटीला शिंदे गटात सामील
उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.