कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा; खासदार भावना गवळींचं उद्धव ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:41 PM2022-06-22T17:41:23+5:302022-06-22T17:41:45+5:30
शिवसेनेकरिता निर्णय घ्यावा हीच सेवेशी पुनश्च नम्र विनंती असल्याचं भावना गवळी यांनी पत्रात म्हटलं आहे
मुंबई - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांसह आता काही खासदारांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेतली आहे. याबाबत शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्या अशी साद घातली आहे.
याबाबत भावना गवळी(Bhavana Gawali) यांनी पत्रात काय म्हटलंय की, आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते, सद्यास्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे असं त्यांनी सांगितले.
शिवसेना खासदार भावना गवळी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र @OfficeofUT#Shivsenapic.twitter.com/NjF2BgZhOL
— Lokmat (@lokmat) June 22, 2022
त्याचसोबत आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरिता विनंती करत आहोत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरिता निर्णय घ्यावा हीच सेवेशी पुनश्च नम्र विनंती असल्याचं भावना गवळी यांनी पत्रात म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं कळालं. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा असा प्रस्ताव शिंदे आणि समर्थक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या आमदारांनी शिवसेनेतच बंड पुकारलं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचा मोठा गट असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना पत्राद्वारे व्हीप पाठवून बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले.