खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण? हे की ते?; कट्टर शिवसैनिकांमध्येही संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 06:15 AM2022-07-03T06:15:58+5:302022-07-03T06:16:22+5:30
शिवसेनेतील उलथापालथीनंतर खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दगडू सकपाळ, माजी आमदार, शिवसेना
शिवसेना या पक्षाची ५० वर्षांपूर्वी नोंदणी झाली. आतापर्यंतच्या काळात पक्षात आमदार झाले किती आणि बाहेर गेले किती, याचा काही हिशोब नाही. कोणीही गेले तरी मूळ शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि राहणार. आता आमदारांचा एखादा गट फुटून गेला म्हणून त्यात बदल होणार नाही.
जे बाहेर पडले त्यांनी शिवसेना हे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरू नये. बाळासाहेबांचे नाव वापरण्याचा तर त्यांना अधिकारच नाही. शिवसेना ही एखाद्या स्थिर झाडासारखी आहे. त्याची जुनी पाने गळाली तरी तिथे नवीन येतात, पुन्हा बहर येणारच. शिवसेनेत आजवर किती बंडखोर झाले, याची गणतीच नाही. जे जातात त्यांची आम्ही परवा करत नाही. राहिले तेच शिवसैनिक. जाणाऱ्यांना ना पक्षाचे नाव वापरायचा अधिकार आहे, ना चिन्ह. सध्या फुटून गेलेल्या आमदारांनी आम्हीच शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याची भाषा चालविली आहे.
यापूर्वीही जे फुटले त्यांनीही दुसऱ्या पक्षात स्थिरस्थावर होईपर्यंत अशीच भाषा केली होती. एकदा दुसऱ्या पक्षात ‘सेट’ झाले की, सगळे विसरले जाते. त्यामुळे आतापासूनच ती वापरू नका. आनंद दिघे यांनी तर आपल्या आयुष्यात कधीच फितुरांना साथ दिली नाही. दुसरा आनंद दिघे होणे नाही. शिवसेना धक्के पचविण्यास सक्षम आहे. शिवसैनिक पुन्हा पक्ष उभा करतील.
नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे
ठाणे महापालिकेतील सर्व ६७ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना सांभाळली म्हणून आम्ही शिंदे यांच्याबरोबर आहोत. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडून शिवसेनेची गळचेपी सुरू होती. त्यातूनच हे बंड झाले आहे, परंतु आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्याच ठाण्यातून आता शिंदे यांना साथ दिली जात आहे, हे बोलके आहे. हिंदुत्वाची भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.
महाविकास आघाडीत हीच हिंदुत्वाची भूमिका हरवल्याचे अनुभवास आले. त्यामुळे आमदारांमधील खदखद वाढत होती. ही खदखद शिंदे यांनी ओळखली आणि त्यातून हे बंड झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी, हा आमचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रवादीकडून वारंवार शिवसेनेची गळचेपी झाली. त्यामुळे शिवसेना संपत असल्याचे दिसत होते. भविष्यात शिवसेना टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या बाजूने आहोत. शिंदे यांनी हिंदुत्वाचा मांडलेला मुद्दा चुकीचा असेल तर त्यांनी सांगावे. शिवसेनेची मूळ भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गैर आहे का? महाविकास आघाडीत असताना मी जेव्हा महापौर होतो, त्या काळात राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्या विरोधात कारवाया सुरू होत्या. त्यांनी मला खूप त्रास दिला.