शिवसेनेला आणखी एक धक्का; मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:33 PM2022-06-26T15:33:15+5:302022-06-26T15:33:54+5:30
उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत.
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचं समोर आले आहे. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. ANI या वृत्त संस्थेने याबाबत ट्विट केले आहे.
उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
नुकतेच दोन दिवसापूर्वी उदय सामंत म्हणाले होते की, मी अजूनही शिवसेनेतच आहे. मी रत्नागिरीतील पाली इथे निवासस्थानी आहे. मी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असतो, तर मी गुवाहाटीला गेलो असतो आणि तिथून तुमच्याशी बोललो असतो, अशी कोपरखळी पत्रकारांना काढली होती. सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं होते.
Correction | Uday Samant*, Maharashtra Minister of Higher & Technical Education joins Eknath Shinde faction at Guwahati. He is the 8th minister to join the Shinde camp: Sources pic.twitter.com/cFFt43yEFk
— ANI (@ANI) June 26, 2022
तसेच मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही. मला वाटतं की, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट निर्माण केला, म्हणजे त्यांचे मत बदललं असं नाही असं उदय सामंत म्हणाले होते. त्यामुळे उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गेलेत की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
शिंदे-फडणवीस यांची भेट नाही
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही असं सांगत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी अधिक भाष्य करणं टाळलं.