"लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 09:39 PM2022-08-08T21:39:02+5:302022-08-08T21:43:28+5:30
एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक सवाल
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. हे सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी भाजपा आणि शिंदे गट यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे सत्तास्थापना झाल्यानंतर बरेच वेळा दिल्लीवारी करताना दिसले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली. तशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पत्रकार परिषद आपल्या फेसबूक पेजवरून लाईव्ह केली होती. त्यावेळी त्यांनी फेसबुकवरील कमेंट्सचा पर्याय बंद ठेवला होता. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांना काही कात्रीत पकडणारे सवाल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करत सवाल केली. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का? मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे", अशा शब्दांत NCP च्या अधिकृत फेसबूक पेजवरून मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले.
दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आधी हे अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती होती. पण या संदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. ९ ऑगस्ट म्हणजे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे विस्तारानंतर किमान एक आठवडा मंत्र्यांना आपल्या खात्याचा आढावा आणि अभ्यास करता यावा या हेतुने अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले असल्याचे बोलले जात आहे.