Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदार गुवाहाटीत दाखल, अज्ञात स्थळी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:08 AM2022-06-22T07:08:29+5:302022-06-22T07:10:23+5:30
Eknath Shinde: हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत.
गुवाहाटी - हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले. त्यांना नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र विमानतळावरून हे आमदार कुठे गेले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आसाम विमानतळावर उतरल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्यासोबत ४० आमदार आहेत. तसेच आणखी १० आमदारांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार असून, आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
"A total of 40 MLAs are present here. We will carry Balasaheb Thackeray's Hindutva," said Shiv Sena leader Eknath Shinde after arriving in Guwahati, Assam pic.twitter.com/1v2nKoTBZR
— ANI (@ANI) June 22, 2022
दरम्यान, विधान परिषदेचा निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत थेट सूरत गाठले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीच्या बातमीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. शिवसेनेच्या एकेका आमदारांना संपर्क साधून वर्षा बंगल्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची मोठी बैठक पार पडली. यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवण्यात आले. शिवसेनेचे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलून आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले.