शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:10 AM2024-07-06T10:10:31+5:302024-07-06T10:11:05+5:30

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते.

Eknath Shinde Shivsena focus now on Assembly in thane | शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू

शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता शिंदेसेनेकडून ठाणे विधानसभेवर आपला दावा पुन्हा एकदा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यापूर्वी ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे आता पुन्हा तो ताब्यात घेण्यासाठी शिंदेसेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाणे विधानसभेत मिळालेले मताधिक्य हे शिवसेनेचे असल्याने हा दावा केला जात असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने ठाणे आणि कल्याण लोकसभा ताब्यात घेत, जिल्ह्यावर आपला वरचष्मा दाखवून दिला आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही लोकसभेत मिळविलेल्या मतांचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे. कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा हे दोन मतदारसंघ शिंदे सेनेकडे आहेत. परंतु ठाणे मात्र भाजपकडे आहे. आता या विधानसभा निवडणुकीत ठाणे पुन्हा आपल्या ताब्यात घेत ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद पूर्ण करण्यासाठी शिंदेसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. 

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. संजय केळकर विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्यात लढत झाली होती. या लढतीत भाजपने केळकरांकरवी शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने मनसेच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा देत केळकरांना पाडण्यासाठी खेळी केली होती. त्यात केळकर हे आमदार झाल्यापासून विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेवर आगपाखड करीत आले आहेत. बेकायदा बांधकामांचा मुद्दा असो, हुक्का पार्लर, नालेसफाई आदी मुद्यांवर केळकर यांनी युती असतानाही शिवसेनेला ‘सळो की पळो’ केले होते. अधिवेशनात केळकर यांनी त्यादृष्टीने मुद्दे उपस्थित केल्याचे दिसून आले.

शिंदेसेनेसाठी डोकेदुखी
केळकर हे शिंदेसेनेसाठी डोकेदुखीच ठरू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करून हा बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आता जोरबैठकांचा सपाटाही सुरू झाला असल्याची माहिती शिंदेसेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

Web Title: Eknath Shinde Shivsena focus now on Assembly in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.