Gram Panchayat Election Result: शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा, पहा जिल्ह्यानुसार आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:19 PM2022-09-19T19:19:50+5:302022-09-19T19:20:28+5:30
Gram Panchayat Election Result Update: दोन जिल्ह्यांत भाजपाला घवघवीत यश, शिंदे गटाला एकाच जिल्ह्याने तारले... राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला किती...
राज्यात झालेल्या ५४७ ग्राम पंचायतींमधील निवडणुकांचा आज निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायतींवर वर्चस्व स्थापित केल्याचा दावा केला आहे. हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच जनतेने शिंदेंची शिवसेना आणि भाजपाच्या युतीला स्वीकारल्याचे ते म्हणाले.
आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा तुम्ही म्हणता तसा शिंदे गट नसून ही शिवसेना आहे. दुसरी जी आहे ती शिल्लक सेना आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असून ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालात साडे पाचशे पैकी ३०० हून अधिक जागांवर आम्ही जिंकलो आहोत. ही भविष्याची नांदी आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप यापुढे एकत्रित निवडुका लढवणार आहे. सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हा सर्वांना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
यानंतर शिंदे यांनी ठाकरे गटाला त्यांचे अडीच वर्षांचे काम पाहून लोकांनी मत दिले, आम्हाला दोन महिन्यांचे काम पाहून मत दिले. यामुळे कोणाचा चांगले यश मिळाले हे तुम्हीच ठरवा, असा टोला लगावला.
आतापर्यंत हाती आलेले निकाल...
- नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. शिवसेनेने 13 तर भाजपा आणि काँग्रेसकडे प्रत्येकी पाच ग्रा. पं. गेल्या आहेत. माकप- 08 आणि शिंदे गटाकडे १ ग्रा. पंचायत गेली आहे.
- पुण्यात ६१ पैकी ३० ग्रा. पंचायती या राष्ट्रवादीकडे, सहा बिनविरोध झाल्या आहेत. भाजपाकडे ३, शिवसेना २, शिंदे गट ३ आणि स्थानिक आघाड्यांकडे २३ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
- यवतमाळमध्ये ७० पैकी ३३ ग्रा. पंचायती काँग्रेसकडे गेल्या आहेत. शिवसेना 3, भाजप 20, राष्ट्रवादी 09, मनसे 1 आणि स्थानिक आघाड्यांकडे 6 ग्राम पंचायती गेल्या आहेत.
- जळगाव जिल्ह्यात 13 पैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३, अपक्षांना ४ आणि भाजपा, काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही.
- धुळे जिल्ह्यात भाजपाला ३३ ग्रा. पं. पैकी ३२ जागांवर भाजपा जिंकली आहे. एकच ग्रा. पं. राष्ट्रवादीला मिळाली आहे.
- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी २०, भाजपा १६, आणि स्थानिक आघाड्यांना ९ ग्रा. पंचायती मिळाल्या आहेत.
- कोल्हापूरमध्ये एकाच ग्रा. पंचायतीची निवडणूक होती. यामध्ये मुश्रीफ गटाने बाजी मारली.
- नंदुरबारमध्ये ७५ पैकी ४२ ग्रा. पंचायतींवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदेगटाला २८, अपक्ष ४ आणि राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.