Eknath Shinde vs Sanjay Raut: "कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:21 PM2022-07-10T16:21:11+5:302022-07-10T16:21:59+5:30

पंढरपूरातील महापूजेनंतर साधला निशाणा

Eknath Shinde slams Sanjay Raut for controversial comments about Goddess Kamakhya Devi Assam Guwahati | Eknath Shinde vs Sanjay Raut: "कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

Eknath Shinde vs Sanjay Raut: "कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

googlenewsNext

Eknath Shinde vs Sanjay Raut: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. अखेर ८-१० दिवसांनी हा बंडखोर आमदारांना पाठिंबा देत भाजपाने सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आज आषाढी एकादशीचे निमित्त साधून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढपूरच्या विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. त्यानंतर पंढरपूरात झालेल्या मेळाव्यात त्यांनी तुफान फटकेबाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर आमदारांवर सातत्याने टोकाच्या शब्दात टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊतांना एकनाथ शिंदेंनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. कामाख्या देवीचा संदर्भ घेत शिंदे यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

"ही लढाई सोपी नव्हती. ५० आमदारांची जबाबदारी माझ्यावर होती. मी सर्व आमदारांना सांगितलं होतं की मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. जेव्हा मला असं वाटेल की काही त्रास होतोय तेव्हा मी एकटा त्याला सामोरा जाईन आणि टोकाचा निर्णय घ्यावा लागला तरीही मागेपुढे पाहणार नाही. आमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. कामाख्या देवीकडे बळी म्हणून काही रेडे पाठवले आहेत असं काही बोललं गेलं. पण अखेर कामाख्या देवीने काय केलं, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये", अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, बंडखोर आमदार गुवाहाटी येथे असताना कोण रिक्षा वाला, कोण टपरीवाला अशा शब्दांत संजय राऊत त्यांचा उल्लेख करत होते. आसामच्या गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे मंदीर आहे. ती देवी रेड्याचा बळी घेते असं ऐकलंय. आम्ही आमच्याकडून ४० रेडे पाठवले आहेत. त्यांचा बळी द्या, असेही शब्द संजय राऊत यांनी उच्चारले होते. त्यावरून एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिले. त्याआधी, एकनाथ शिंदेंचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राऊतांवर टीका केली होती. 'आम्ही रेडे पाठवले आहेत असं काहीजण म्हणाले. पण ही आपली संस्कृती नाही. आज त्याच कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? असा प्रश्न उपस्थित झाला तर काय बोलावं लागेल', असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला होता.

Web Title: Eknath Shinde slams Sanjay Raut for controversial comments about Goddess Kamakhya Devi Assam Guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.