Eknath Shinde Devendra Fadnavis: आता बोला... CM एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी..." (Video Viral)
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:32 PM2022-12-07T14:32:06+5:302022-12-07T14:33:29+5:30
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत
Eknath Shinde Video Viral: महाराष्ट्रात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यात जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री बनतील असा अंदाज बांधला जात होता. पण त्याउलट घडलं आणि सारेच अवाक झाले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी, समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी फडणवीसांनी स्वत: कार चालवली व शिंदे शेजारी बसले होते. तेव्हादेखील, राज्याच्या सरकारचं स्टेअरिंग (निर्णय घेण्याची क्षमता) फडणवीसांकडेच आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. त्यांच्या तोंडून जरी ही गोष्ट चुकून निघाली असली, तरी त्यावरून आता राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत हेच कदाचित एकनाथ शिंदे विसरले. मुंबईच्या गोरेगाव येथील कोकण महोत्सवा दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना 'राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी...' असे म्हटले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पाहा नक्की एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Video)
स्वत: एकनाथ शिंदे राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. पण असे असताना स्वत:चेच पद विसरून किंवा अनावधनाने त्यांच्या तोंडून देवेंद्र फडणीवसांचा मुख्यमंत्री उल्लेख केला गेला. आधी विरोधकांकडून वारंवार टोमणे मारले जात असताना, असे घडणे म्हणजे नक्की काय, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यावेळी, भाजपा श्रेष्ठींच्या या निर्णयाने फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्या निर्णयाचा राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनाही धक्का बसला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस देखील शपथविधीच्या ठिकाणी काहीसे नाराज दिसून येत होते. मात्र सरकार अस्तित्वात आल्यानंतर, एकंदर कार्यशैली पाहता शिंदे यांच्यापेक्षा फडणवीसांनाच निर्णय घेण्याचे अधिक स्वातंत्र्य आहे अशी टीका विरोधक करताना दिसतात. अशा वेळी शिंदे यांच्या तोंडून असा उल्लेख चुकून होणे हा निव्वळ योगायोग जरी असला तरी अनेकांना यात पुढची समीकरणेही दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, या विषयावर दोन्ही नेते किंवा त्यांच्या पक्षाकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.