प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचं काम आता केलं जात आहे - श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:31 PM2022-06-25T17:31:57+5:302022-06-25T17:32:22+5:30

श्रीकांत शिंदे यांनी समर्थकांमध्ये जाऊन आपले रोखठोक विचार मांडले.

eknath shinde son shrikant shinde speaks on maharashtra political condition mlas congress ncp | प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचं काम आता केलं जात आहे - श्रीकांत शिंदे

प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचं काम आता केलं जात आहे - श्रीकांत शिंदे

googlenewsNext

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, शनिवारी काही लोकांनी श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालवरही हल्ला करत तोडफोड केली. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी समर्थकांमध्ये जाऊन आपले रोखठोक विचार मांडले. तसंच प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रभर लोकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करा, आमदारांच्या घरावर जा असं सांगितलं जात आहे. दगडफेक करा असं सांगतात पण येतात चार लोक. माझ्याही कार्यालयावर लांबून दगड मारून पळाले. शिवसैनिक असाल तर समोर या असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी केलं. ५० लोकांची साथ एकनाथ शिंदेंना आहे. अनेकांना आपल्या मतदार संघात चांगलं काम होईल असं वाटत असल्याचंही ते म्हणाले.

आम्ही फक्त एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिकवणीवरून शांत आहोत. आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र कोणत्याही धमक्या खपवून घेणार नाही. आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत कारण एकनाथ शिंदे कायम त्यांच्यासाठी प्रत्येक क्षणी असतात. एकनाथ शिंदेंच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी कायम खुले असतात. एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी कायम उभे असतात, असंही ते म्हणाले.

कोरोनाच्या काळातही एकनाथ शिंदेंनी पायाला भिंगरी लावून काम केलं. ते घरी बसले नाही. वेळ पडली तेव्हा पीपीई किट घालून ते रुग्णालयात गेले. अशात त्यांना दोनदा कोविडही झाला. आठवतंय कल्याणचे महानगर प्रमुख बंड्या साळवी यांना कोविड झाला. परिस्थिती त्यांची वाईट होती. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन केला, भेटायला या. तेव्हा त्यांनी पीपीई किट घालून त्यांना भेटायला गेले. मुलाच्या डोक्यावर हात फिरवतात तसं ते तिकडे होते. त्यांनी फोनवरून खोटं आश्वासन दिलं नाही. आम्ही त्यांना सांगायचो, मलाही भीती होती त्यांना काय झालं तर काय होईल. त्यांनी आपली, कुटुंबीयांची पर्वा केली नाही. त्यांनी कार्यकर्त्यांची पर्वा केली, असंही ते म्हणाले.

आज त्यांचं काय चुकलं?
आज त्यांचं काय चुकलं? त्यांच्याबरोबर मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. एकनाथ शिंदेंनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलं. आज आपली सत्ता आहे, पक्ष मजबूत झाला पाहिजे, आपली कामं झाली पाहिजे म्हणून ते तिथे गेले. आघाडीत घुसमट होतेय असं त्यांना अनेकांनी सांगितलं. जिथे शिवसेनेचे जास्त आमदार आहेत, तिथे पालकमंत्री राष्ट्रवादीचं देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी पडलेल्या आमदारांना राष्ट्रवादीनं रसद पुरवली. पाच वर्षांनी राष्ट्रवादीचा माणूस जिंकून येईल आणि आपला पक्ष कमकूवत होईल, हे सर्व आमदारांचं ऐकलं हे त्यांची चूक आहे का असा सवालही त्यांनी केला.

Web Title: eknath shinde son shrikant shinde speaks on maharashtra political condition mlas congress ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.