जबरदस्तीनं सूरतला नेल्याच्या नितीन देशमुखांच्या आरोपावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:06 PM2022-06-22T14:06:23+5:302022-06-22T14:07:35+5:30
राज्यात शिवसेनेच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन आमदार माघारी परतले आहेत.
मुंबई-
राज्यात शिवसेनेच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन आमदार माघारी परतले आहेत. नागपूर विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया देत सुखरुप माघारी परतल्याचं म्हटलं. पण सूरतमध्ये आपल्याला जबरदस्तीनं नेण्यात आलं होतं आणि रुग्णालयात दाखल करुन इंजेक्शन दिलं गेलं असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. नितीन देशमुख यांच्या आरोपावर आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"त्यांना जर जबरदस्तीनं आम्ही इथं आणलं असतं तर मग त्यांना आता नागपूर विमानतळावर सोडायला दोन माणसं कशाला पाठवली असती", असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून नागपूरला परतले आहेत. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, 'मला काहीही झाले नाही. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने इस्पितळात नेले. मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मी त्यांचाच शिवसैनिक आहे'
"माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले’’, गुवाहाटीवरून परतलेल्या नितीन देशमुख यांचे गंभीर आरोप
"मला चुकीच्या पद्धतीनं सूरतला नेलं गेलं. त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. रुग्णालयात नेल्यावर २० २५ जणांनी जबरदस्तीने पकडून माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचं षडयंत्र त्या लोकांचं होतं. त्यामागे त्यांचा काय हेतू होता, हे मला माहिती नाही. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आणि शेवटपर्यंत त्यांचाच शिवसैनिक राहीन", असं नितीन देशमुख म्हणाले.
नितीन देशमुखांचं विधान फेटाळून लावत एकनाथ शिंदे यांनी असं काहीही झालेलं नाही. "नितीन देशमुख यांच्यासोबत असं काहीच झालेलं नाही. त्यांच्यासोबत असं जर काही करायचं असतं तर मग नागपूर विमानतळावर त्यांना सोडायला आम्ही आमची दोन माणसं कशाला पाठवली असती?", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्यासोबत ४६ आमदार
"आम्ही बंडखोर नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि राहणार. हिंदुत्वाच्या मार्गावर आम्ही चालत आहोत आणि आतापर्यंत ४६ आमदार आमच्यासोबत आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात नवा पेच निर्माण झाला आहे.