'त्या' ५० कोटींवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; सभागृहात पत्रच दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 09:47 AM2023-08-05T09:47:59+5:302023-08-05T09:48:55+5:30
ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
मुंबई – गेल्या वर्षी शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या पाऊलामुळे शिवसेनेत २ गट निर्माण झाले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद कोर्ट, निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेतील रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र दाखवून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे आम्हाला रोज शिव्याशाप देता तर दुसरीकडे ५० कोटी आम्हाला द्या असे पत्र पाठवता. शिवसेना खात्यातील हे ५० कोटी आहेत. आता शिवसेना कोणाकडे आहे? आमच्याकडे. आम्हाला गद्दार म्हणायचे, खोकेबाज म्हणायचे मग खरे खोकेबाज कोण? मी १ मिनिटाचाही विचार न करता तात्काळ पैसे देऊन टाका असं सांगितले. कारण आम्हाला तुमची संपत्ती, मालमत्ता काही नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. हे ५० कोटी आम्ही देऊन टाकले असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही. त्यांना केवळ पैसे, ५० खोके यावरच केवळ डोळा आहे. इतर आमदारांनी त्यावर नक्की विचार करा. हे सहन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. शिवसैनिक आमचे भोळेभाबडे आहेत. प्रत्येकाच्या वाटेला हे आले आहे. आम्ही घरादारावर तुलसीपत्र ठेऊन संघटनेचे काम केले. त्यातून शिवसेना उभी केलीय. वापरा आणि फेकून द्या असं उद्धव ठाकरे कधी करतील हे कुणालाही कळणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.
दरम्यान, शिवसेनेचे पैसे असतील ते मागितले तर पाप काय? शिवसेना पक्षाला ते पैसे दिले होते. ते मागितले त्यात चुकीचे काय नाही. सरकार मूळप्रश्नापासून पळतंय, जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिले जात नाही. लक्षवेधी मांडली जाते मंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे काम सरकार करतंय. शासन आपल्या दारी येऊन निवडणुकीचे पत्र देते. शासनाच्या दारात अधिकारी बदल्यांसाठी फिरतात. मोठ्या प्रमाणात बदलीसाठी भ्रष्टाचार होतोय. सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यास कुचकामी ठरतेय. विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारण्यास यशस्वी ठरले आहे असं प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.