'बाळासाहेबांनी फुलवलेला अंगार अन् आताचा वैचारिक भंगार'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 08:34 PM2023-10-10T20:34:45+5:302023-10-10T20:35:28+5:30
"तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही"
Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महिन्याभरापूर्वीच अर्ज करण्यात आले होते. मात्र आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असतानाच एखनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला डिवचल्याचे दिसून आले आहे.
शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले #शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती."
#हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2023
"बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल. कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?", असा टोला शिंदे यांनी लगावला.