'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 06:42 PM2023-04-02T18:42:59+5:302023-04-02T18:43:22+5:30
'राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करतात. उद्धव ठाकरे त्यांना जाब विचारणार का?'
मुंबई- आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) मोठा राजकीय संग्राम पाहायला मिळणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा होत आहे, तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) सुरू आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंना आजच्या सभेबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, 'ही कसली वज्रमूठ? वज्रमूठ चांगल्या लोकांची असते. ही तर 'वज्रझूठ' आहे. सभा घेण्याची परवानगी सर्वांना आहे, पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ही सभा होत आहे. बाळासाहेबांनी संभाजीनगरची मागणी केली होती आणि आज तिथेच ही सभा होत आहे. बाळासाहेबांनाही हे पाहून दूःख होत असेल. सावरकरांनी देशासाठी समुद्रात उडी टाकली, हे सत्तेसाठी कोलांटउड्या मारतात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना चोख उत्तर देईल. '
'हे तिघे फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत, विचारांसाठी नाही. आमची युती विचारांची युती आहे. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांनी एका विचाराने युती केली. पण, यांनी सत्तेसाठी विचार बाजुला ठेवले. ही महाविकास आघाडी कशासाठी झालीये, हे आपल्याला माहितीये. त्यांचे नेते वारंवार स्वातंत्रवीरांचा अपमान करतात. हा फक्त त्यांचा अपमान नाही, तर सर्व देशभक्तांचा अपमान आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचा अपमान आहे. सावरकरांचे विचार समाजात पोहोचले पाहिजेत, त्यामुळेच आम्ही सावरकर गौरव यात्रा काढत आहोत. बाळासाहेबांचे चिरंजीव आज राहुल गांधींना जाब विचारणार का? असंहे शिंदे यावेळी म्हणाले.