'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 06:31 PM2023-04-02T18:31:10+5:302023-04-02T18:31:28+5:30
'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.'
मुंबई: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि भाजप-शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'बाळासाहेबांनी अतिशय विचार करुन शिवधनुष्य उचलले होते. शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठं मन लागतं, हिंदुत्वाबद्दलचे विचार आणि कार्यकर्त्याच्या पाठिशी उभे राहण्याची वृत्ती लागते. ती बाळासाहेबांच्या अंगात होती. पण, आताचे प्रमुख फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात. त्यांना कार्यकर्त्याशी काही देणंघेणं नाही,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले, 'बाळासाहेबांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी तशाप्रकारचे विचारही लागतात. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आम्हाला शिवधनुष्य मिळालं. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब, आनंद दिघे यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे, अशी आमची भावना आहे.'
9 एप्रिलला अयोध्येला जाणार
येत्या '9 तारखेला सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसोबत सर्वांना अयोध्येला जाणार आहे. मागे काही नेत्यांना विमानातून उतरावं लागलं होतं, त्यामुळे अनेक नेत्यांची संधी हुकली. आता सगळ्यांना सोबत घेऊन जाणार. शरयू नदीवर आरतीही करणार आहोत. बाळासाहेबांचे आणि देशातील करोडो लोकांचे स्वप्न होते की, राम मंदिर बांधले पाहिजे. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. कार सेवेत आनंद दिघेंनी चांदीची विट पाठवली होती. त्याप्रमाणे आम्ही सागाचे लाकूड पाठवत आहोत. हा आमचा खारीचा वाटा असेल,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.