Shivsena Dasara Melava: शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला येत असताना तीन मोठ्या घटना; वाहनांचा अपघात, हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:25 PM2022-10-05T16:25:46+5:302022-10-05T16:26:29+5:30
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बस, कार आणि रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. यानुसार कालपासून राज्यभरातील गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या.
शिवसेना कोणाची, याचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सुमारे पाच लाख कार्यकर्ते बीकेसीमधील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जमा होणार आहेत. परंतू, मुंबईला येत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत अपघात, मृत्यू, मारहाणीसारखे प्रकार घडले आहेत.
शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बस, कार आणि रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. यानुसार कालपासून राज्यभरातील गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यावेळी शिंदे गटाची वाहने जाण्यासाठी लोकांसाठी बंद असलेला समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला होता. यावेळी अर्जुन खोतकरांच्या ताफ्याने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मंगळवारी शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला येत असताना त्यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला होता. समृद्धी महामार्ग खुला करण्यावर शिंदे गटाने ही महामार्गाची ट्रायल असल्याचे हास्यास्पद उत्तर दिले होते.
दुसरीकडे आज सकाळी य़वतमाळहून मुंबईकडे निघालेल्या शिंदे समर्थक कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. श्रीकृष्ण मांजरे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
तर आज आणखी एक धक्कादायक घटना घडली असून नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गटांचा रस्त्यावरच मुंबईकडे येत असताना राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये वादाची ठिकणी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नाशिकमधून शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे येत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना डिवचले. यावेळी शिंदे गटातील शिवसैनिकांपैकी काही शिवसैनिकांनी महिलांकडे पाहून काही हातवारे केल्याचा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.
त्यानंतर शिवसैनिकांनी गाड्या अडवून शिंदेगटातील शिवसैनिकांशी वाद घातला. तसेच या कार्यकर्त्यांना गाडीबाहेर खेचून त्यांना मारहाण केली. या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले असून, त्यामध्ये गाडीतील शिवसैनिक या महिला शिवसैनिकांची माफी मागताना दिसत आहेत.