विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 09:22 AM2022-07-12T09:22:18+5:302022-07-12T09:23:11+5:30
विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले
मुंबई - अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे २ आमदार निवडून आल्याने परिषदेत त्यांचे संख्याबळ १३ इतके झाले आहे. विरोधी पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्याने आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा नेमण्यात यावा याचा ठराव विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी दिला आहे.
विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली. सध्याच्या आकडेवारीत विधान परिषदेत महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे पत्र शिवसेनेच्या आमदारांनी उपसभापतींना दिले आहे. यात आमदार अंबादास दानवे, सचिन आहिर, मनिषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे इत्यादी उपस्थित होते.
येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार आहे. यापूर्वीचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ७ जुलै रोजी मुदत संपली. ते विधान परिषदेत पुन्हा निवडून आलेत. मात्र कार्यकाळ संपल्यामुळे परत परिषदेच्या सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक होईल. त्यात सत्ताधारी भाजपा-शिंदे गट सभापतीपदासाठीही उमेदवार उतरवणार आहे. विधानसभेत भाजपाचे राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांना १६४ मते मिळाली होती. विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनल्यास सभागृहात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कारभारावर आक्रमकपणे भाष्य करणाऱ्या आमदाराच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते.
“शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”
कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.