Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, सत्यासाठी लढत राहू', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:27 PM2022-09-27T18:27:03+5:302022-09-27T18:27:47+5:30
'आजचा निर्णय म्हणजे, धक्का नाही आणि दिलासाही नाही. जिथे सुनावणी होईल, तिथे लढायला तयार.'
मुंबई: शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे, या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात चारही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया आली आहे.
न्यायदेवतेवर विश्वास आहे
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आजचा निर्णय म्हणजे, धक्का नाही आणि दिलासाही नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडे गेले आहे. जिथे सुनावणी होईल, तिथे आम्ही लढायला तयार आहोत. आमचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा लढा लोकशाहीसाठी, संविधानासाठी आहे. आमचा संविधानावर, लोकशाहीवर, न्यायदेवतेवर विश्वास आहे. हा सर्व प्रकार संपूर्ण देश बघत आहे.'
पुढेही आम्ही लढत राहू..
'सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगासमोर पूर्ण ताकतीने लढू, सत्यासाठी लढत राहू. आजचा निर्णय म्हणजे, शिवसेनेला धक्का बसला असे त्यांना वाटत असेल. पण, हा धक्का नाही आणि दिलासाही नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हा हे गद्दार टेबलावर चढून नाचले होते. त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नाही. आम्ही पुढेही सत्यासाठी लढत राहू,' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.