Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: शिवसेनेचे नगरसेवक कुणाकडे? शिंदे की ठाकरे? समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:02 PM2022-06-25T13:02:45+5:302022-06-25T13:03:36+5:30
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली असताना राज्यातील २७ महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची काय भूमिका आहे, ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार की शिंदेंच्या गटात जाणार याचा ‘लोकमत’च्या चमूने घेतलेला हा आढावा.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली असताना राज्यातील २७ महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची काय भूमिका आहे, ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार की शिंदेंच्या गटात जाणार याचा ‘लोकमत’च्या चमूने घेतलेला हा आढावा.
५३२ नगरसेवकांचा कल
राज्यातील २७ महापालिकांमध्ये शिवसेनेचे एकूण ५३२ नगरसेवक आहेत. सांगली, पनवेल आणि लातूर या महापालिकांमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. या नगरसेवकांनी अजूनही थेटपणे आपले पत्ते उघडलेले नाहीत.
मुंबई/कोकण
मुंबई ९७
भूमिका : आजमितीस तरी सर्व नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहेत. आम्ही आमच्या नगरसेवकांच्या आणि विभाग स्तरावर बैठका घेत असून एकही नगरसेवक फुटणार नाही, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
नवी मुंबई ४७
भूमिका : आता प्रशासक असल्याने सर्व माजी नगरसेवक आहेत. शिंदे यांच्या समर्थकांनी नगरसेवकांची जुळवाजुळव ही सुरू केली असून २८ ते ३० नगरसेवक बंडखोर शिंदे यांच्या बाजूला झुकलेले आहेत.
ठाणे ६७
भूमिका : सर्वच्या सर्व ६७ नगरसेवक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिंदे यांनी अजूनही शिवसेना सोडलेली नाही आणि आम्हीही शिवसेनेत आहोत. आमचे समर्थन शिंदे यांनाच आहे, असे नगरसेवक सांगतात.
उल्हासनगर
२५ (दोघांचे निधन)
भूमिका : सध्या शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक संभ्रमित आहेत. तर माजी महापौर लीलाबाई अशान व बहेनवाल यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शिवसेनेत राहत असल्याचे सांगितले.
पनवेल
०
भूमिका : पनवेल महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही.
मीरा-भाईंदर
२२
भूमिका : एका नगरसेवकाचे निधन झाले असून २ नगरसेविका भाजपच्या गोटात आहेत. तर १९ नगरसेवक सध्या सेनेसोबत आहेत.
कल्याण-डोंबिवली
५१
भूमिका : दोन नगरसेवकांचे निधन झाले असून ६ नगरसेवक भाजप सोडून शिवसेनेत आले. महापालिकेच्या राजकारणावर एकनाथ शिंदे यांचा पगडा असल्याने शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदेची कास धरतील, असेच चित्र आहे.
भिवंडी १२
भूमिका : भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, शहरातील नगरसेवक वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. शिंदे की ठाकरे याबाबत उघड भूमिका येथील नगरसेवकांनी अजूनही घेतली नाही.
पश्चिम महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवड ९
भूमिका : शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेबरोबर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ठाकरेबरोबरच राहणार आहोत.’’
सोलापूर २१ (एकाचा मृत्यू)
भूमिका : दोन नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. दोन नगरसेविका आणि एक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश त्याच्या तयारीत आहेत. उर्वरित १५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.
पुणे १०
भूमिका : कोणीही बंड करू द्या कितीही ताकद दाखवावी पण आम्ही फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच आहे, असे पुण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी व शहराध्यक्ष संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
कोल्हापूर ४ (त्यातील एकाने यापूर्वीच साथ सोडली आहे)
भूमिका : तीनही नगरसेवकांनी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सांगली ०
२००८ पासून शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक ३३
भूमिका : अद्याप कोणीही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाही.
मालेगाव १२
भूमिका : अद्याप कोणीही जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अथवा विरोधात पुढे आलेले नाही. राज्यात आघाडी सरकार येण्यापूर्वीच मालेगाव महापालिकेत काँग्रेस-शिवसेना युतीची सत्ता होती, तर उपमहापौरपद शिवसेनेकडे होते.
धुळे ०२
भूमिका : धुळे महापालिकेतील शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक हे ठाकरे घराण्याशी निष्ठावान आहेत. या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे.
जळगाव अधिकृत १५ व भाजप बंडखोर २३
भूमिका : महापौर जयश्री महाजन, ज्योती तायडे, ष्णू भंगाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, तर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
अहमदनगर २५
भूमिका : जनतेतून निवडून आलेल्या २३ पैकी एकाही नगरसेवकाने स्पष्ट अशी भूमिका अद्याप घेतलेली नाही. मात्र, स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी शुक्रवारी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.
मराठवाडा
औरंगाबाद
२८ + ०५ समर्थक अपक्ष, एकूण ३३
भूमिका : ९०% नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. पाच ते सहा नगरसेवक शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. त्यामुळे विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार शिंदे गटाकडे जाण्यास तूर्त तयार नाहीत. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यास बहुतांश नगरसेवक तिकडे जाऊ शकतात.
नांदेड वाघाळा ०१
भूमिका : आमदार बालाजी कल्याणकर हेच नांदेड महापालिकेमध्ये शिवसेनेचे एकमेव नगरसेवक आहेत आणि ते एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत.
लातूर ००
भूमिका : लातूर महापालिकेची मुदत २५ मे रोजी संपलेली आहे. लातूर मनपामध्ये काँग्रेस ३३, भाजप ३६ आणि राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल होते.
परभणी ०५
भूमिका : पाचही नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तो अभेद्य आहे. कायमस्वरुपी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहोत, अशी प्रतिक्रिया मनपातील शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे यांनी दिली.
विदर्भ
अमरावती ०७
भूमिका : सर्व नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काहीही वाटा नसून कोणीही समर्थक नाही, अशी माहिती गटनेता प्रशांत वानखडे यांनी दिली.
अकोला ०८
भूमिका : सर्व नगरसेवक हे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख यांच्यासोबत आहेत. नितीन देशमुख हे शिंदे यांच्या गटातून महाराष्ट्रात परतले आहेत. त्यांनी मी शिवसेनेसोबतच राहील असे स्पष्ट केले आहे. सर्व नगरसेवकांचीही तीच भूमिका आहे.
चंद्रपूर ०१
भूमिका : चंद्रपूर महापालिकेत विशाल निंबाळकर व सुरेश पचारे हे दोन शिवसेना नगरसेवक होते. मात्र, निंबाळकर भाजपमध्ये गेले. त्यामुळे सुरेश पचारे हेच एकमेव सेना नगरसेवक आहेत. पचारे म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. शिंदे गटाशी आम्हाला काही देणेघेणे नाही.
नागपूर ०२
भूमिका : शिवसेनेचे किशोर कुमेरिया व मंगला गवरे हे दोन्ही नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. या नगरसेवकांनी नुकतेच शिवसेना कार्यालयापुढे ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.