Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट
By विजय पाटील | Published: August 8, 2022 11:02 PM2022-08-08T23:02:01+5:302022-08-08T23:02:58+5:30
Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते.
हिंगोली : राज्यात विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेराेजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहोत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत केले.
संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात आ. संतोष बांगर यांनी मराठा आरक्षण, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे कळमनुरी येथेही कार्यालय, लमाणदेव मंदिर, आदिवासी भवनासाठी प्रत्येकी ५ कोटी, औंढा नागनाथसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेची मंडळी टीका करीत असल्याने आमचा नाद करू नका. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशारा दिला. दगड मारा, गाडी फोडा जिल्हाप्रमुख करू, असे म्हणणाऱ्यांना महिनाभरापासून जिल्हाप्रमुख भेटत नाही. तुम्ही काय टक्कर देणार, असा सवाल केला.
यावेळी खा. हेमंत पाटील यांनीही माजी खासदार सुभाष वानखेडेंवर टीका करून महाराजांच्या वंशजाला राज्यसभा देत नसाल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेनेने शिवसैनिकांना कायम लाचार बनवून ठेवल्याचा आरोपही केला .
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत. मात्र त्यांना कामातून चोख उत्तर देऊ. जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली. बाळासाहेबाच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली. तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे. यात चूक कोणाची? हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले. आता डबल इंजीनचे सरकार आहे. केेंद्र भरभरून मदत करायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तसे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तर अतिवृष्टीत झालेले नुकसान मी डोळ्यांनी पाहिले, यापूर्वी कधी झाली नसेल तेवढी मदत देऊ, असे जाहीरपणे सांगितले.
१० कोटींचा निधी जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर करून टाकला. तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केेंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. तर ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून खेड्यापाड्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू. मात्र तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.
संतोष बांगर एकेक आमदार माझ्याकडे पाठवत होते
आ.संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.