राज्यात ‘शिंदे’शाही; एकनाथ शिंदे म्हणाले, “आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:24 PM2022-06-30T17:24:51+5:302022-06-30T17:25:07+5:30
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांना भाजपाचा पाठिंबा देणार असून या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व ५० आमदारांचे आभार मानत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नसल्याचं म्हटलं.
“जो विश्वास भाजपनं आमच्या ५० आमदारांवर दाखवलाय तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्या ५० आमदारांच्या जोरावर ही लढाई लढलोय त्यांचे आभार मानतो. ज्या ५० लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही याची खात्री करेन,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले फडणवीस?
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात २ मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, रोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर आम्ही लढायचं. ज्यांना आपण हरवलं त्यांना निधी देण्याचं काम केले जात होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे गरजेचे होते. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ असं वारंवार आम्ही सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नाही. भाजपा-शिंदे गटाचे आमदार आणि १६ अपक्ष, घटक पक्षांचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. आणखी काही आमदार आमच्यासोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.