एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:59 IST2025-01-22T14:58:43+5:302025-01-22T14:59:39+5:30
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली.

एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?
मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सेनेच्या दोन्ही गटांनी या दिवसाचं औदित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित केलेत. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बीकेसीच्या मैदानात पार पडणार आहे. शिंदेसेनेकडून २३ जानेवारीला शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडूनही शिवसैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
२०२५ मध्ये उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मुंबईत महापालिका निवडणूक आहे. त्यात राज्यातील शिवसैनिकांचा मेळावा अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर घेण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजता एकीकडे एकनाथ शिंदेंच्या सेनेचा शिवोत्सव साजरा होणार तर दुसरीकडे अंधेरी पश्चिमेत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसैनिकांचा मेळावा!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 21, 2025
आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे,
आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे!!
दिनांक: गुरुवार, २३ जानेवारी २०२५
वेळ: संध्या. ६ वाजता
ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई. pic.twitter.com/NkUIAdnM1m
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ठाकरे - फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा हे दोन्ही नेते एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच खासदार संजय राऊत यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे या चर्चांना आणखी वेग आला.
उद्धव ठाकरे काय बोलणार?
शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका पुढील काही महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. या मेळाव्यानंतर २४ जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठकही उद्धव ठाकरेंनी बोलावली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला २० जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत ९ खासदार निवडून आले. राज्यसभेचे २ आणि विधान परिषदेत ७ सदस्य ठाकरे गटाचे आहेत.