...तरीही मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:17 PM2023-10-29T12:17:07+5:302023-10-29T12:17:40+5:30
"शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात हाच तर फरक आहे", असा टोलाही लगावला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, विधानसभा अध्यक्ष त्यांचा निर्णय देतीलच; पण कायद्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा प्रकारच्या प्रकरणात काय निकाल पूर्वी आले याची कल्पना ज्यांना आहे, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा त्यांचे आमदार अपात्र ठरणार नाहीत, याची खात्री आहे, मलादेखील तीच खात्री आहे. मी हेही सांगतो की, हा जरतरचा विषय आहे; पण समजा शिंदे विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले तरी त्यांचे मुख्यमंत्रिपद जाणार नाही, ते विधान परिषदेवर जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते. कालच्या ‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओवर ते म्हणाले की, शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढविली जाईल.
पवार फडणवीसांमध्ये फरक
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांच्याकडे ११० आमदार आहेत. त्यामुळे त्यांना नजरअंदाज करता येत नाही.
- मात्र, माझ्याकडे ११० आमदार असते तर मी नवीन सरकार बनवले असते, असे विधान केले. याबद्दल विचारले असता हाच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक आहे.
- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास पूर्ण ताकदीने करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण कोणी घालवले?
संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता, भाजपने समर्थन केले. ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण त्यांनी घालवले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.