जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 06:18 AM2024-01-14T06:18:42+5:302024-01-14T06:20:27+5:30
१९व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन
नालासोपारा : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन महाराष्ट्र राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. जगाला हेवा वाटावा, असा विकसित महाराष्ट्र घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरार येथे केले.
जागतिक मराठी अकादमी आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने व साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई यांच्या सहकार्याने विवा महाविद्यालय येथे १९ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी याचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला असेल, तरी त्याची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुराणिक यांचे अभिनंदन केले. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन, वाशी येथे आयोजित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तुम्ही उद्योग उभारा, प्रगतीचे मार्ग माझ्या हातात - राणे
संमेलनाच्या पहिल्या सत्राला केंद्रीय मंत्री नारायण प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी आ. हितेंद्र ठाकूर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच आज संमेलनाला १० मिनिटे आधीच आलो. जागतिक मराठी परिषदेने मराठी माणसाच्या प्रगतीची दिशा ठरवावी, नियोजन करावे. जपान, अमेरिका, चीन या देशांच्या तोडीने उभे राहण्यासाठी तंत्र आत्मसात करा आणि उद्योग उभारा, प्रगतीचे मार्ग माझ्या हातात आहेत, मी तुम्हाला सर्व सहकार्य करायला तयार आहे, असे राणे यावेळी म्हणाले.