शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:45 PM2024-11-27T16:45:36+5:302024-11-27T16:47:14+5:30
Eknath Shinde PC: शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतू, त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचे वक्तव्य केलेले नाही. तसेच उद्या महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जाणार, बैठक घेणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
शिंदे काय म्हणाले...
गेल्या अडीच वर्षांत भाजपा आणि केंद्र सरकारने खूप पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या काळात बंद झालेल्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ यांसह अनेक योजना राबवल्या. यशस्वी केल्या. सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.