समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 06:16 PM2019-12-11T18:16:53+5:302019-12-11T18:17:14+5:30
समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे.
मुंबईः मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्या या मागणीला इतर मंत्र्यांनाही पाठिंबा दिला असून, लवकरच हा मार्ग 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाणार असल्याचं राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा हा निर्णय होईल आणि ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण होतील. समृद्धी महामार्ग तीन वर्षांच्या आत पूर्ण होईल. 20 ते 22 टक्के काम प्रगतिपथावर आहे. नागपूर- मुंबई हे 15 तासांचं अंतर समृद्धी महामार्गामुळे सहा तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे त्या भागातल्या विकासाला चालना मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सगळ्याच भागाला न्याय मिळणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्यातला नाही तर देशातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा एमएसआरडीसीच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहोत. देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं हा महामार्ग गेमचेंजर ठरणार असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची भाजपाची मागणी आहे. तर भाजपाचे आमदार असलेल्या गणपतराव गायकवाड यांनी समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशीही मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेनं बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला आहेत. तशा आशयाचं पत्रच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यावेळी भाजपा व शिवसेनेची युती असल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं पेच निर्माण झाला होता. पण आता मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच असल्यानं समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे.