Maharashtra Vidhan Sabha: "एकनाथ शिंदेजी, ...तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल’’, भास्कर जाधवांचं भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:50 PM2022-07-04T13:50:30+5:302022-07-04T13:51:54+5:30
Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली.
मुंबई - विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर सरकारच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली. तसेच भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केले आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. पण आपल्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. तसेच फारशी बोलचालही झाली नाही. मात्र गतवर्षी कोकणात आलेल्या पुरामध्ये तुम्ही मोलाचं काम केलं हे मी मान्य करतो. पण आता कोण कोणाविरोधात लढणार आहे. तर आमदार विरोधात गेलेत आणि शिवसैनिक छातीचा कोट करून खंबीरपणे लढताहेत. महाराष्ट्रात महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे, अशी भीती भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा हा तुमचा वापर शिवसेनेविरोधात करून घेत आहे, असं सांगत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्हाला भाजपावाले लढवताहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे वाद लावून लढवताहेत. मात्र यामध्ये रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. यात घायाळ होतील ते शिवसैनिक होतील. संपेल ती शिवसेना संपेल. भाजपाचा २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर तो शिवसेनेला संपण्याचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची मी अनेक उदाहरणं मी सांगू शकेन. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याबाबत मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी दोन पावलं माघारी या, असं मी तुम्हाला आवाहन करतो. एकनाथरावजी, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही. फुटीपासून वाचवली तर हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, असं भावनिक आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी केलं.