एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:31 IST2025-02-03T19:31:32+5:302025-02-03T19:31:57+5:30
Maharashtra Politics: आपल्या नेतृत्वात दैदिप्यमान यश प्राप्त झालेले असतानाही आपल्याला मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले नाही याची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातून वेळोवेळी दिसून येत आहे.

एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात दैदिप्यमान यश प्राप्त झालेले असतानाही आपल्याला मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले नाही याची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातून वेळोवेळी दिसून येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजेरी लावणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीलाही दांडी मारल्याने शिंदे नाराजच असल्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
एवढेच नाही तर शिंदे यांच्या खात्याने बोलविलेली नगर विकास आणि पाणीपुरवठा विभागाची बैठकही रद्द करण्यात आली होती. शिंदेंचे सरकार असताना फडणवीस शिंदेंच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असायचे. परंतू , आता शिंदे मात्र फडणवीसांच्या सोबत वारंवार दिसत नाहीत. उलट अजित पवार आणि त्यांचे मंत्री मात्र या बैठकांना उपस्थित राहत आहेत. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे यावर आता चर्चा झडू लागल्या आहेत.
फडणवीसांच्या बैठकीला अजित पवार व त्यांचे मंत्री उपस्थित होते. सोशल वॉर रुमबाबत ही बैठक बोलविण्यात आली होती. सरकारविरोधी दावे, प्रतिदावे तसेच सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन यात करण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीला शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून उपस्थित रहायला हवे होते. परंतू, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगण्यात आलेले नाही.
पालकमंत्री पदावरून महायुतीत धुमसत आहे. फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना अचानक रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांना या जागांवर वर्णी लावायची आहे. स्थगिती झालेल्या मंत्र्यांमध्ये आदिती तटकरे आणि भाजपचे गिरीष महाजन यांचे नाव होते. यामुळे शिंदेंनीच हे घडवून आणल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होती. अशातच उद्धव ठाकरे भाजपासोबत येत असल्याच्या वृत्तांनीही जोर पकडला आहे. बिहारमध्ये असलेला नितीशकुमारांचा टेकू कोणत्याही क्षणी हलू शकतो, याची तजवीज म्हणून भाजपा ठाकरेंना सोबत घेणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आदित्य ठाकरेंनी एकाच दिवशी फडणवीसांची दोन-तीनदा भेट घेतली होती. यामुळे या चर्चांना जोर आला होता. यावरूनही शिंदे नाराज असल्याचे कयास बांधले जात आहेत.