शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदेंचं उत्तर; मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:47 PM2022-06-22T15:47:06+5:302022-06-22T15:47:31+5:30

एकनाथ शिंदे यांनी उघडपणे शिवसेना नेतृत्वासमोर बंड केल्यानंतर तातडीने शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली.

Eknath Shinde's answer to Shiv Sena's; Selection of Bharat Gogavale as Chief Representative in vidhan sabha | शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदेंचं उत्तर; मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची निवड

शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदेंचं उत्तर; मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची निवड

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या निकालात क्रॉस व्होटिंग होऊन संख्याबळ नसताना भाजपाच्या पाचव्या उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचं संख्याबळ वाढलं त्याचसोबत महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेसची मते फुटली असल्याचं समोर आले. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे काही समर्थक आमदारांसह अचानक नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. शिंदे आणि आमदार गुजरातच्या सूरत येथे हॉटेलला असल्याचं कळाल्याने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची कुणकुण लागली. 

एकनाथ शिंदे यांनी उघडपणे शिवसेना नेतृत्वासमोर बंड केल्यानंतर तातडीने शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली. परंतु या बैठकीत शिवसेनेचे मोजकेच आमदार उपस्थित झाले. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांना गटनेते बनवलं. परंतु ही निवड बेकायदेशीर असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कारण शिवसेनेच्या ४५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा मला आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे गटनेता मीच असल्याचं शिंदे म्हणाले. 

शिवसेनेत बंडखोरी का केली?; शिवसैनिकांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

यानंतर शिवसेनेने मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने सर्व आमदारांना मुंबईत सायंकाळी ५ वाजता बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले. जर बैठकीस उपस्थित न झाल्यास कायदेशीर कारवाई करून सदस्यत्व रद्द होईल असं सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेच्या या खेळीला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात तांत्रिक लढाई सुरू झाल्याचं दिसून येते. 

शिवसेनेच्या पत्रात काय म्हटलंय?
शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजता ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात येणार आहे. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वांना व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राजकीय परिस्थिती लक्षात घेता याला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे. 

बंडखोरांची आमदारकी रद्द होणार?; शिवसेनेची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना धक्का

तसेच ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई मेल पत्त्यावर पाठवलेली आहे. त्या व्यतिरिक्त समाज माध्यमे, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे कळवले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध, पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणांस गैरहजर राहता येणार नाही. या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. 
 

Web Title: Eknath Shinde's answer to Shiv Sena's; Selection of Bharat Gogavale as Chief Representative in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.