शिंदेंच्या आमदाराच्या बॉडीगार्डकडून रॉडने मारहाण, ठाकरे गटाचा दावा; व्हिडीओ केला पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:17 PM2024-09-11T18:17:51+5:302024-09-11T18:22:13+5:30
Shiv Sena UBT post Video : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मारहाण करत असलेला व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करण्यात आला. आमदार थोरवेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
Uddhav Thackeray Sena post Video : एक व्यक्ती रॉडने कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. आजूबाजूचा लोक पाहत आहे. या घटनेचा व्हिडीओ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्यक्ती आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षारक्षक असल्याचा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मात्र, आमदार थोरवे यांनी हा दावा फेटाळला आहे.
जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ती घटना नेरळमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाकडून व्हिडीओ पोस्ट करताना एकनाथ शिंदे सरकारवर लक्ष्य करण्यात आले आहे.
"मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच", ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
हा व्हिडीओ पोस्ट करताना ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे की, "महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायको, मुले रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!"
"ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
आमदार महेंद्र थोरवे काय म्हणाले?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी फेटाळला आहे. "कार्यकर्त्यांमध्ये आपापसात मतभेद झालेले आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा सुरक्षारक्षक नाही. ज्याने मारहाण केली आणि ज्याला मारहाण झाली, ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत", असे थोरवे म्हणाले.
"गेल्यानंतर माहिती घेईन. आम्हाला सत्तेची मस्ती काही नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. ठाकरे गट त्याचे भांडवल करत आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल", असेही थोरवे यांनी सांगितले.