मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:14 AM2023-10-25T00:14:39+5:302023-10-25T00:15:07+5:30
Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
सध्या राज्यात कळीचा मुद्दा ठरत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेत सर्वांना न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या कृतीनंतरही सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण ते कोर्टात टिकणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला आणखी किती वेळ द्यायचा. आरक्षणासाठी लागणारे सर्व निकष आम्ही पूर्ण केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाल मान दिला आहे. आता त्यांनी मराठ्यांच्या शब्दाचा सन्मान करावा. सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी आरक्षाचा निर्णय या रात्रीत घ्यावा, अन्यथा उद्यापासून आम्ही लढायला सज्ज आहोत, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत म्हणाले होते की, मीदेखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे, मला त्यांची दु:खं कळतात. वेदना कळतात. एस.टी. शिंदे समिती काम करतेय. सर्वोच्च न्यायालयाने आमची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आरक्षाच्या लढाईतील एक दरवाजा खुला झाला आहे. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता हे आरक्षण मराठा समाजाला देणार. या एकनाथ शिंदेंच्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. मी छत्रपतींच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केलं.