एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
By admin | Published: January 25, 2017 08:13 AM2017-01-25T08:13:00+5:302017-01-25T11:06:05+5:30
नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 - नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने गोंधळ घालत या कर्मचा-याला मारहाण केल्याची माहिती आहे.
संदीप घोंगडे असे मारहाण करण्यात आलेल्या टोल कर्मचा-याचे नाव आहे. संदीप घोंगडेवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एकनाथ शिंदे एका लग्नसोहळ्यासाठी नाशिकला गेले होते. तेथून पुन्हा ठाण्याकडे परतताना ही घटना घडली आहे. दरम्यान, जखमी कर्मचा-याने शिंदेंची माफी मागितल्यानंतर परिसरातील तणाव कमी झाला.
अद्यापपर्यंत या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदेंच्या सुरक्षरक्षकाविरोधात तक्रार केल्यास नोकरी जाण्याची भीती असल्याने कर्मचारी घाबरुन तक्रार दाखल करत नसल्याचेही बोलले जात आहे.
मारहाण झालीच नाही - एकनाथ शिंदे
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. काच फुटल्याने संबंधित कर्मचारी जखमी झाला, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले आहे. शिवाय, सीसीटीव्हीमध्ये सुरक्षारक्षक मारहाण करताना आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले आहेत.