शिंदेंच्या शिवसेनेचा १८ जागांवर दावा; गेल्यावेळच्या २२ पैकी ४ जागा कोणाला सोडल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:17 AM2024-02-27T07:17:26+5:302024-02-27T07:17:51+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीचे जागावाटपही अद्याप निश्चित झालेले नाही. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाची बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.
जागावाटपाची चर्चा आणि अधिकार पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला. शिवसेनेकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
बैठकीतील निर्णय
२०१९ ला शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी शिवसेना १८ जागांवर दावा करण्यावर खासदारांचे एकमत झाले. उरलेल्या ४ जागांचे भविष्य मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतील, असे अधिकार संसदीय दलाने त्यांना दिले आहेत.
निवडणूक काळात करण्यात येणाऱ्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय, इतर महामंडळांची केलेली घोषणा आणि शिवडी नाव्हाशेवासारखी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची केलेली घोषणा हे यंदाच्या प्रचाराचे मुद्दे असतील.