एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच मुहुर्त ठरला, ९ एप्रिल रोजी जाणार रामलल्लांच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:36 AM2023-04-03T00:36:13+5:302023-04-03T00:37:32+5:30
Eknath Shinde visit to Ayodhya: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारीही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
दरम्यान अयोध्या दौरा हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहणार नाही. अयोध्येत शरयू नदीच्या किनारी राम मंदिर व्हावे, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडं पाठवली आहेत. राम मंदिर आंदोलनावेळी आनंद दिघे यांनी राम मंदिरासाठी चांदीची विट पाठवली होती, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या वज्रमुठ सभेवर टीका केली. 'ही कसली वज्रमूठ? वज्रमूठ चांगल्या लोकांची असते. ही तर 'वज्रझूठ' आहे. सभा घेण्याची परवानगी सर्वांना आहे, पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ही सभा होत आहे. बाळासाहेबांनी संभाजीनगरची मागणी केली होती आणि आज तिथेच ही सभा होत आहे. बाळासाहेबांनाही हे पाहून दूःख होत असेल. सावरकरांनी देशासाठी समुद्रात उडी टाकली, हे सत्तेसाठी कोलांटउड्या मारतात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना चोख उत्तर देईल. ' असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.