‘एकता विनायक गोखले’च्या निरोपाची हुरहुर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:31 AM2020-02-27T02:31:27+5:302020-02-27T02:31:34+5:30
मराठी भाषेचा हरवलेला दुवा जोडून एकाकीपणा केला होता दूर
- अपर्णा वेलणकर
एकता विनायक गोखले. जन्म १९७९ चा. चाळीस वर्षे ती उत्तर अमेरिकेसह जगातील मराठी माणसांची मैत्रीण होती. महासागर ओलांडून गेलेल्या एकाकी मराठी मनाला आधार द्यायला दुसरे कुणी नव्हते, पुलंचे शब्द नी भीमसेन व कुमारांचे स्वर कानी पडणे दुर्मिळ होते, लाडू, करंज्या आणि आकाशकंदिल नसल्याने परदेशातील दिवाळी उदास होती...
अशा इंटरनेटपूर्व काळात कॅनडाच्या टोरोण्टो मध्ये जन्मलेली ही ‘एकता’. तिने दूरदेशी वास्तव्याला गेलेल्या कित्येक मराठी संसारांना सोबत केली, बोला-ऐकायला दुर्मीळ होऊन बसलेल्या मराठी भाषेचा हरवला दुवा जोडून एकाकीपणा दूर केलँ. एकमेकांना फोन करणे परवडत नव्हते, अशा काळात उत्तर अमेरिकेत नव्याने आलेल्या मराठी कुटुंबांची एकमेकांशी गाठ घालून दिली. बदलत्या काळाने दूरदेशी वास्तव्यातील सीमारेषा पार पुसून टाकल्याने आपल्या मैत्रीची जुनी गरज सरली आहे हे लक्षात घेऊन ‘एकता’ने या महिन्यात ‘निरोप’ घेतला.
अंकाचे संपादन करणे, त्यासाठी नवनव्या कल्पना काढणे, लेख मागवणे, आवाहने करणे, अंकाची मांडणी करण्यापासून पत्ते चिकटवलेल्या अमेरिकेत पाठवायच्या अंकांच्या थैल्या टोरोण्टोपासून १६0 किमी वरच्या बफेलो पोस्टात नेऊन टाकण्यापर्यंतची सगळी उस्तवार होत गोखलेच करीत.
जागतिकीकरणाची लाट येण्याच्या कितीतरी आधी दहा-पंधरा हजार मैलांचे अंतर ओलांडून उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी कुटुंबांच्या प्रवासाचा ‘एकता’ हा एक संपन्न दस्तावेजच आहे. विनायक-प्रतिभा गोखले यांच्यासह अनेकांनी ‘ना नफा’ तत्वावर चालवलेले हे त्रैमासिक यावर्षी पूर्णविराम घेते झाले आहे.
आता ‘एकता’चा प्रेमळ बाप निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहून कृतार्थ निरोप देतो आहे. सध्या गोखल्यांना दृष्टीदोषाने ग्रासले आहे. पण ‘एकता’बद्दल बोलताना त्यांच्या नजरेतले प्रेमाचे लखलखते पाणी अख्ख्या चाळीस वर्षांची कृतार्थ कहाणी सांगते.
(उत्तर अमेरिकेतली ‘मराठी’ कहाणी : अग्रलेखाच्या पानावर)
कोण आहे एकता विनायक गोखले?
हे उत्तर अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे ‘एकता’ त्रैमासिक! १९६४ साली दूरदेशी गेलेल्या विनायक गोखले यांनी मित्रांसह ‘एकता’ला जन्माला घातले व पोटच्या मुलीसारखे परदेशातल्या पहिल्या मराठी त्रैमासिकाचे लालनपालन केले.
एकताचा पहिला अंक निघाला फेब्रुवारी १९७९ मध्ये. पहिला अंक पूर्णत: विनायक गोखले यांच्या अक्षरात होता, कारण मराठी टाइपसेटिंगचे दिवस दूर होते.
एकता १९८७ पर्यंत ‘हस्तलिखित’च असे. संगणकयुग सुरू झाल्यावर १९९३ पासून मग हे ‘हस्तलेखन’ संपले.