अनेक कलाविष्कारांनी रंगली पूर्वसंध्या!
By admin | Published: February 20, 2016 01:27 AM2016-02-20T01:27:20+5:302016-02-20T01:27:20+5:30
नटवर्य मामा पेंडसे यांच्या नाटकातील प्रवेश, लावणी, विनोदी स्कीट, कोळीगीते अशा विविध कलाविष्कारांनी नाट्यसंमेलनाची पूर्वसंध्या रंग
नटवर्य मामा पेंडसे यांच्या नाटकातील प्रवेश, लावणी, विनोदी स्कीट, कोळीगीते अशा विविध कलाविष्कारांनी नाट्यसंमेलनाची पूर्वसंध्या रंगली. निमित्त होते, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे तिथे काही नाही उणे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारी सायंकाळी उभारलेल्या नटवर्य मामा पेंडसे रंगमंचावर हा कार्यक्रम पार पडला. नटेश्वराची वंदना सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर, नटवर्य मामा पेंडसे यांच्या ‘दुरितांचे तिमीर जावो’ या नाटकातील प्रवेश जयंत सावरकर, शहाजी काळे, प्रतिभा कुलकर्णी, अमोल पंडित या कलाकारांनी सादर केला. सचिन मोहिते याने ‘हा छंद जीवाला’ त्यानंतर मोहिते आणि प्रशांत काळुंद्रे यांनी सादर केलेल्या ‘ले लो भाई चिवडा ले लो’ या गीताला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
काळुंद्रेकर यांनी सादर केलेल्या ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ या गीतामध्ये रसिक मंत्रमुग्ध झाले होते. ‘वासाचा पयला पाऊस आयला’ हे गीत मोहिते याने आपल्या खास शैलीत सादर केले. ‘माघाची थंडी’ ही लावणी व त्यानंतर पं. सुरेश बापट यांनी नाट्यपद सादर केले. श्याम फडके यांना समर्पित म्हणून एक विनोदी स्कीट विकास समुद्रे व सीया पाटील यांनी सादर केले. शाहीर दामोदर विटावकर यांना आदरांजली म्हणून सादर करण्यात आलेल्या कोळीगीते व कोळीनृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
अंजली आमणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जयंत सावरकर व भावना लेले यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी महापौर संजय मोरे, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक उपस्थित होते.