आॅस्टीन पती-पत्नीचे समाजकार्य मोठे : पवार
By admin | Published: August 24, 2016 01:25 AM2016-08-24T01:25:03+5:302016-08-24T01:25:03+5:30
अंधकारमय आयुष्य असणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे कोणतेही सामाजिक काम सर्वश्रेष्ठ आहे.
बारामती : ‘‘अंधकारमय आयुष्य असणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे कोणतेही सामाजिक काम सर्वश्रेष्ठ आहे. बिल आॅस्टिन व टिन आॅस्टिन या दांपत्याने मागील २५ वर्षांत २० लाख लोकांचे, बालकांचे आयुष्य बदलले, हे फार मोठे समाजकार्य आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच व स्टार की हिअरिंग फाउंडेशन यांच्या वतीने व येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्यातून एक हजार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल श्रवणयंत्रे बसविण्याचे अभियान दोन दिवस सुरू होते. शनिवारी (दि. २०) या अभियानाचा समारोप झाला.
पवार म्हणाले, ‘‘मागील ३० ते ३५ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात विविध भागांत सामाजिक उपक्रम सुरू आहेत. ठाण्यापासून ते गडचिरोलीपर्यंत आदिवासी भागात सुरुवातीच्या काळात अपंगांसाठी काम झाले. सध्या १०० बहिरेपणा असलेल्या व्यक्तींमध्ये ७० टक्के प्रमाण हे बालकांचे आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच त्यांना योग्य वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे.
या वेळी स्टार की फाउंडेशनच्या वतीने शरद पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुनंदा पवार यांनी आभार मानले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेंद्र पवार, बिल आॅस्टिन, टिन आॅस्टिन, रोहित मिश्रा, के. पी. पाटील, सुनंदा पवार, सुनेत्रा पवार, नगराध्यक्ष योगेश जगताप, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे आदी
उपस्थित होते. (वार्ताहर)