विधानसभा अध्यक्षाची निवडणूक : संग्राम थाेपटे, चव्हाण यांच्या नावांना पक्षश्रेष्ठींची संमती?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:35 AM2021-12-27T05:35:13+5:302021-12-27T05:36:13+5:30
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी विधिमंडळ कामकाज नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : महाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदासाठी दिल्लीहून काँग्रेस श्रेष्ठींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थाेपटे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांना संमती दिली आहे. यात आमदार थाेपटे यांचे नाव सर्वांत आघाडीवर असल्याचे समजते.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी विधिमंडळ कामकाज नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार संग्राम थाेपटे यांनी चांगलीच फिल्डिंग लावली हाेती. काही दिवसांपूर्वी ते दिल्लीत येऊन गेले हाेते. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त दिले हाेते. यासाेबत पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव साेबत ठेवले आहे; परंतु चव्हाण यांनी हे पद भूषविण्यास नकार दिल्याचे समजते.
नियमांमध्ये बदल
राज्य विधिमंडळ नियम ६ (१) नुसार विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख राज्यपाल निश्चित करतील, अशी तरतूद हाेती; परंतु यात बदल करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख निश्चित करावी, अशी दुरुस्ती झाल्याचे डाॅ. कळसे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन २७ डिसेंबरला निवडणूक घेण्यात यावी, अशी शिफारस केलेली आहे.