निवडणुकांचा बिगुल वाजला आता युतीचा बँड वाजेल!
By admin | Published: January 15, 2017 04:13 AM2017-01-15T04:13:19+5:302017-01-15T04:13:19+5:30
महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, आता लवकरच सत्ताधारी युतीचा बँड वाजणार, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार
सोलापूर : महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, आता लवकरच सत्ताधारी युतीचा बँड वाजणार, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात ‘लोकमत’शी बोलताना केले.
राज्यातील ९ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पुढील महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, असे असले, तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच भाजपा, शिवसेना या पक्षांमध्ये आघाडी वा युती करण्याचा निर्णय झालेला नाही. सर्वच पक्ष शड्डू ठोकून फडात उतरण्यास तयार असल्याचे निदान वरवर तरी दाखवत आहेत. हादेखील त्यांच्यातील जागावाटपाच्या राजकारणाचाच भाग आहे. याच पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची का, करायची असल्यास कशी, याबाबत प्रदेश काँग्रेस समिती निर्णय घेणार आहे. तरीही मतांची विभागणी होऊ नये, म्हणून आघाडी होणे महत्त्वाचे आहे, असे मत अनेक नेतेमंडळी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भाजपा-शिवसेना हे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत. मात्र, आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. रुसून अन्य पक्षात गेलेले काही जण आता पुन्हा पक्षात येण्याबद्दल विचारणा करतात. मात्र, मी हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. महापालिका निवडणुकीबाबत वेगवेगळी चर्चा असली, तरी पुन्हा काँग्रेस आघाडीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वासही शिंदे यांनी बोलून दाखविला.
- राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय प्रदेश काँग्रेस समिती घेणार आहे. भाजपा-शिवसेना हे काँगे्रसचे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत. मात्र, आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़- सुशीलकुमार शिंदे