केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची निवडणूक जाहीर
By admin | Published: October 24, 2014 12:05 AM2014-10-24T00:05:15+5:302014-10-24T00:17:23+5:30
‘निहा’ची होणार बैठक : कोल्हापूरचे ‘वेट अँड वॉच’
कोल्हापूर : केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या (सीसीएच) निवडणुकीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील ‘निहा’ संघटनेसह होमिओपॅथिक डॉक्टरांनी सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. पॅनेल स्थापनेनंतरच निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.‘सीसीएच’वर होमिओपॅथी डॉक्टर विभागातून पाच सदस्य निवडून देण्यासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वैद्य कुलदीप राज कोहली यांनी केली आहे. निवडणुकीची प्रक्रिया दि. ७ नोव्हेंबर ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘सीसीएच’ कार्यकारिणी ५५ सदस्यांची असते. त्यात देशातील विविध राज्यांतून सदस्य म्हणून होमिओपॅथी डॉक्टरांची निवड करण्यात येते. कोल्हापुरातून आजपर्यंत या कार्यकारिणीत एकही सदस्य झालेला नाही. यावेळी निवडणुकीत सहभागी होण्याचा विचार जिल्ह्यातील न्यू इंटिग्रेटेड होमिपॅथिक असोसिएशनने(निहा) केला आहे. असोसिएशनचे जिल्ह्यात सुमारे १ हजार ८०० सदस्य आहेत. मात्र, मुंबई, पुणे आदींसह अन्य ठिकाणी निवडणुकीसाठी कोणते पॅनेल, उमेदवार कोण असणार आहेत. त्याचा विचार करूनच ‘निहा’ पुढील निर्णय घेणार आहे. (प्रतिनिधी)
‘सीसीएच’मध्ये कोल्हापूरला आतापर्यंत एकदाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यावेळी प्रतिनिधित्व करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य पातळीवर होणारे पॅनेल, उमेदवार यांचा आम्ही पहिल्यांदा अंदाज घेणार आहोत. निवडणुकीबाबतचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेतला जाईल.
- डॉ. राजेश पाटील
(जिल्हाध्यक्ष, निहा)