महापालिका निवडणुकीचे बिगुल

By admin | Published: August 23, 2016 06:49 AM2016-08-23T06:49:33+5:302016-08-23T06:49:33+5:30

राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच रणधुमाळीला सुरुवात होईल.

The Election Commission | महापालिका निवडणुकीचे बिगुल

महापालिका निवडणुकीचे बिगुल

Next


मुंबई : राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच रणधुमाळीला सुरुवात होईल. उल्हासनगर महापालिकेसाठी ३० सप्टेंबर, बृहन्मुंबई महापालिकेसाठी ३ आॅक्टोबर; तर उर्वरित ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी केली आहे.
बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्च/एप्रिल २०१७ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस २३ सप्टेंबर २०१६ पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तारखांना महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल. आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत बृहन्मुंबईसाठी ५ ते २० आॅक्टोबर; तर उर्वरित महापालिकांसाठी १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत संबंधित महापालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी देतील. (विशेष प्रतिनिधी)
> मुंबईत एक सदस्यीय प्रभाग रचना
बृहन्मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महापालिकांसाठी २०११च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येईल. बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग रचना एकसदस्यीय; तर अन्य सर्व महापालिकांची प्रभाग रचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाईल.
बृहन्मुंबई महापालिकेसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी देण्यात येईल. २२ नोव्हेंबरला मुंबईची; तर उर्वरित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस २३ सप्टेंबर २०१६पर्यंत मान्यता देण्यात येईल.

Web Title: The Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.