राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
By admin | Published: May 9, 2014 11:01 PM2014-05-09T23:01:51+5:302014-05-10T01:22:45+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सकृतदर्शनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे नमूद करून निवडणूक आयोगाने शुक्रवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
वादग्रस्त वक्तव्याची दखल
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सकृतदर्शनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे नमूद करून निवडणूक आयोगाने शुक्रवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. भाजपा सत्तेवर आल्यास देशात हिंसाचार होईल. २२,००० लोक मारले जातील, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.
नोटिसीला १२ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर द्या. मुदतीच्या उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशमधील सोलान येथील १ मे रोजी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात भाजपाने आयोगाकडे तक्रार केली होती.
राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरू असताना ईव्हीएम असलेल्या भागात प्रवेश करीत नियमांचे उल्लंघन केले काय, याबाबत तपास करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. तर भाजपाने वाराणशीमधील निवडणूक अधिकार्यावर पक्षपाताचा आरोप केल्यानंतर आयोगाने तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार यांना विशेष निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
शुक्रवारी दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत राहुल गांधी यांच्या ईव्हीएम प्रकरणावर चर्चा झाली. पुढील तपासासंबंधीचा अहवाल सोमवारी मिळण्याची शक्यता असून त्याच दिवशी आयोग निर्णय जाहीर करेल, असे निवडणूक आयुक्त एच. एस. ब्राा यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रात राहुल गांधी यांनी ईव्हीएमची तपासणी केल्याच्या वृत्ताची शहानिशा करावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी गुरुवारी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)