सुहास कांदेंच्या याचिकेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, राज्यसभा निवडणुकीत मत अवैध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:52 AM2022-06-16T05:52:02+5:302022-06-16T05:52:18+5:30
आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
मुंबई :
राज्यसभा निवडणुकीत दिलेले मत अवैध ठरविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. कांदे यांची याचिका दाखल करून घेण्यायोग्य नसल्याचे निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले.
कांदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे; मात्र त्यांनी निवडणूक याचिका दाखल करायला हवी, असे आयोगाच्यावतीने ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. धीरज सिंह ठाकूर यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने यासंदर्भातील युक्तिवाद २४ जूनला ऐकू, असे म्हणत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.
निवडणूक आयोगाने आपले मत अवैध असल्याचे जाहीर केल्याने आपल्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल रद्द करावा, अशी मागणी कांदे यांनी याचिकेद्वारे केली आहे. मतपत्रिकेवर शिक्का मारल्यावर नियमाप्रमाणे बाहेर आलो आणि व्हीप जारी करणारे शिवसेना नेते सुनील प्रभू यांना बॅलेट पेपर दाखवला, असे कांदे यांनी याचिकेत म्हटले आहे.