पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 02:17 PM2024-05-08T14:17:01+5:302024-05-08T14:26:40+5:30
भारतीय निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
Graduates and Teachers Constituencies Election : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. चार जागांवरील आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर यासोबत मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार असून १५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे असणार आहे. तर १३ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ-
गेल्या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस हे निवडून आले होते. त्यावेळी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. विलास पोतनीस यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ-
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी निरंजन डावखरे यांनी ही निवडणूक जिंकली.
मुंबई शिक्षक मतदारसंघ-
मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यावेळी कपिल पाटील हे निवडून आले होते.
नाशिक शिक्षक मतदारसंघ-
नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत किशोर दराडे यांनी बाजी मारली होती.